यशाचा पासवर्ड (भाग :20) - कल्पनाशक्ती (Imagination)
कल्पनेचं इवलंसं बीजच कर्तृत्वाचं विशाल विश्व उभं करीत असतं..!
एका व्यक्तीने राजाच्या दरबारात जाऊन तिथल्या साऱ्या विद्वानांना आव्हान दिलं, 'मी जे सांगतो ते करून दाखवलं, तर मी आपली विद्वत्ता मान्य करून माझी हार मानेन..!' राजाने आपल्या पदरी असणाऱ्या विद्वानांच्या वतीने त्याचं आव्हान स्वीकारलं. त्या व्यक्तीने कोंबडीचं अंडं दाखवून सांगितलं, हे अंडं कुठल्याही आधाराशिवाय जमिनीवर उभं ठेवून दाखवावं..'
सारेजण प्रयत्न करू लागले... पण अंडं उभं राहीना... सारे थकले. साऱ्यांनी एका सुरात सांगितलं,' या अंड्याचा आकारच असा आहे कि, ते उभंच राहू शकत नाही. त्या व्यक्तीनेच करून दाखवावं !' साऱ्या विद्वानांनी आपली हार मान्य केल्यावर तो व्यक्ती पुढे आली. तिनं ते अंडं हातात घेतलं आणि तळाच्या बाजूला किंचीत फोडलं आणि उभे केलं. अंडं विनासायास उभं राहिलं. ते पाहताच सारे उद्गारले, अरे , हे तर आम्हीही केलं असतं ! तसा तो व्यक्ती म्हणाला, ' केलं असतं...पण केलं नाही. कारण हे करण्यासाठी आधी हे सुचायला तर हवं. तुम्हाला ते जमलं नाही, कारण अंड तळाशी फोडावं, हे तुम्हाला सुचलं नाही !' हे सुचणं महत्वाचं ! तीच कल्पनाशक्ती आहे...!
नुसती विद्वत्ता असून चालत नाही. विद्वतेचा अचूक आणि प्रभावी वापर करणारी कल्पनाशक्ती हवी ! उदंड पदव्या घेतलेली माणसं यशस्वी होतातच, असं नाही आणि प्रचंड यशस्वी झालेल्या माणसांनी पदव्या घेतल्याच होत्या, असं नाही. अल्पशिक्षण असूनही निव्वळ कल्पनाशक्तीच्या जोरावरच माणसं यशस्वी झाल्याची उदाहरणं अनेक आहेत. कवी , कलाकार , शास्त्रज्ञ यांचीच नव्हे तर जगातील कुठलीही निर्मिती हि कल्पनेतूनच जन्माला येते. कल्पनेशिवाय काहीही निर्माण होत नाही आणि झालंही नाही. जे करायचं आहे, ते कल्पनाशक्तीच्या साह्याने आधी डोळ्यांसमोर साकार होतं. त्याचा आराखडा, स्वरूप, नियोजन हे सारं कल्पनाशक्तीच्या जोरावरच बांधता येतं आणि मगच ते प्रत्यक्षात येतं. सारे गुण असूनही निव्वळ कल्पनाशक्तीचा अभाव, हे अयशस्वी होण्याचं मुख्य कारण !
माणसं जे आहे त्यातच चालत राहतात. जे वर्षानुवर्षे इतर करत आले. तेच करत राहतात. काही नवं शोधावं. नावीन्य निर्मावं. नव्या पद्धतीने काही करावं, हे त्यांच्या ध्यानीमनीही येत नाही. ठरलेल्या पाट्या टाकत अशी माणसं आहे त्याच जागी कायमची रहाटगाड्यात रुतून राहतात. याउलट, जे सातत्याने नव्याचा शोध घेतात. ज्यांच्या डोक्यात सातत्याने नव्या कल्पना जन्म घेतात, ते त्या कल्पनांना खतपाणी घालून प्रत्यक्षात उतरवतात. जे काही करतो तेच, पण अगदी वेगळ्या पद्धतीने करतात. ते इतरांपेक्षा निश्चित वेगळे ठरतात. मोठे होतात ! कल्पनेचं इवलंसं बीजच कर्तृत्वाचं विशाल विश्व उभं करत असतं . तुम्ही कोणत्याही क्षेत्रात ; कोणत्याही व्यवसायात असा , तुमची कल्पना शक्तीच तुम्हाला शिखरावर नेते. तुम्ही कल्पनांचं उत्पादन करत असाल , तर जगातील कोणताही उत्पादन तुम्हाला विकता येतंच. अनेकजण तर कल्पना विकूनच मोठे व श्रीमंत झाले.
चित्रकार पिकासो म्हणतो, तुम्ही ज्याची कल्पना करू शकता , ते सारं प्रत्यक्षात येऊ शकतो ! बस्स कल्पना करत राहा. कल्पना शोधत राहा. जो स्वप्न पाहतो, तो कल्पना निर्माण करू शकतोच. कल्पना शक्ती प्रत्येकात असतेच ; फक्त तीचा योग्य वापर करायला हवा. पण माणसं फक्त स्वप्न रंगवण्यासाठीच कल्पनाशक्तीचा वापर करतात. कल्पनरंजनातच रमत राहतात. करत काहीच नाहीत. कल्पना कृतीत बदलली तर मोलाची ; नाहीतर फुकाची ! तुम्ही कल्पनाशक्तीचा जितका अधिक वापर कराल, तितकी ती वाढत राहील. सृजनात्मक कल्पना चिंतनातून , निरीक्षणातून , प्रत्यक्ष कृतीतून , सातत्यातून निर्माण होते. नवनिर्माणाची प्रेरणा ठरते.
यश युक्तीने वा क्लुप्तीने मिळवता येत नाही; ते कल्पनाशक्तीनेच मिळवता येतं. तुमची एक कल्पना कदाचित उद्याचं विश्व बदलून टाकेल. घडवून टाकेल. इतकं कि, तुम्ही त्याची कल्पनाही केली नसेल !
0 टिप्पण्या