यशाचा पासवर्ड - भाग 12
ध्येयसिद्धी
तुमची ध्येयसिद्धीच तुमची ओळख मागे ठेवते..!
रस्त्याने दोन मुलं चालली होती. उपाशी पोटी होती. दोन दिवस त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. व्याकुळतेने चालतानाच अचानक एकाला वाटेत दोन रुपयाची नोट सापडली. दोघेही विलक्षण आनंदले. एकजण म्हणाला ' जा पटकन, या दोन रुपयाचा खाऊ घेऊन ये !' दुसरा धावत-पळत गेला. परत आला, तेव्हा त्याच्या एका हातात खाऊ होता; तर दुसऱ्या हातात फुल ! म्हणाला हे बघ, हे बघ एक रुपयाचा खाऊ आणला आणि हि एक रुपयाची फुलं ! तसा मित्र चिडला.म्हणाला दोन दिवस आपण उपाशी आहोत. पोटात अन्नाचा कण नाही,असं असतांना तू दोन रुपयाचा खाऊ आणायचं सोडून हि एक रुपयाची फुलं कशाला आणलीस ? त्याचाही खाऊच आणला असतास तर पोटभर खाल्लं तरी असतं ! तसा दुसरा शांतपणे उद्गारला, 'मित्रा हा एक रुपयाचा खाऊ जगण्यासाठी आणि हि एक रुपयाची फुलं कसं जगावं हे कळण्यासाठी !
माणसाचं जगणं असं संतुलीत हवं. जगण्यासाठी जरूर कमवावं पण त्या सोबत आपल्यालाच काय,इतरांनाही निखळ, निरागस आनंद देणाऱ्या फुलासारखं फ़ुलणंही घडावं; तर जगणं सुंदर होतं अन्यथा सारं मिळवूनही हाती शून्य राहतं, वाट्याला फक्त तगमगणं येतं. म्हणूनच ध्येय एकांगी नकोत. त्यातून जगण्याचा समतोल साधता आला पाहिजे. पण माणसं विलक्षण वेगाने ध्येयाकडे धावतात. त्या बेभान धावपळीत हातातील अनेक गोष्टी निसटून जातात, अनेक दुर्लक्षीत राहतात, तर अनेकांकडे दुर्लक्ष होतं. हे सारं घडताना काही चुकतंय याची जाणीव होते खरी. पण काही कमविण्यासाठी काही गमवावं लागतं अशी पल्लेदार धारणा करून घेत माणसं या निसटला गोष्टींकडे न पाहता पळत राहतात. ध्येय गाठतात पण ते गाठल्यावर लक्षात येतं, 'अरे आपण जिंकल्याचा आनंद साजरा करायला कुणीच नाही. जे आपले होते, ते ध्येय गाठण्याच्या नादात आपण कधी माघे सोडले, ते कळलंच नाही. त्यांना सोबतही ठेवता आलं नाही आणि पुन्हा त्यांच्याकडे माघे वळून पाहताही आलं नाही. मग जे जिंकणं पाहायलाच कुणी नाही, ज्या जिंकण्याचा इतरांना उपयोग नाही, ते जिकनं कसलं ?निव्वळ यंत्रवत ध्येयाकडे झेपावत जाणं चुकीचंच ! माणसं हसणं विसरतात. मुक्त विहरणं हरवतात. निसर्ग पाहाणं गमावतात. आनंदाचे क्षण समाधानी मन आणि कृतज्ञतेचे कण माणसं क्षुल्लक म्हणून अक्षरशः फेकून देतात. स्वतः च्याच शरीराची काळजी, आरोग्यविषयक सजगता प्रचंड दुर्लक्षतात, सारं कमवतात;पण तेव्हा उपभोगण्यासाठी आरोग्य नसतं; आस्वाद घ्यायला जगणं शिल्लक नसतं. अशा ध्येयसिद्धी कमावण्याचा उपयोग काय ?
तुमचं ध्येय सत्याच्या आणि प्रामाणिकपणाच्या मार्गावरून तुम्हाला नेत असेल तर ठीक. पण ध्येयपूर्तीसाठी असत्य आणि बेइमानाचा रस्ता तुम्ही पकडणार असाल तर ते काय उपयोगाचं ? इतर तुमच्या यशावर टाळया वाजवतीलही पण जेव्हा त्यांना कळेल कि, हि ध्येयसिद्धी तुमच्या अप्रामाणिकपणाची फलश्रुती आहे. तेव्हा काय घडेल ? ते घडेल तेव्हा घडेल. पण हे घडू शकतं, या सततच्या चिंतेने तुम्ही पोखरत जातात. पण चुकीच्या पद्धतीने यश मिळवलय, हा सल आयुष्यभर तुम्हाला कुरतडत राहतो. अंतिम साध्य ध्येय गाठूनही पराभूतचं ! मन शांत नाहीच !
एका माणसाला वृत्तपत्रात आपल्याच मृत्यूची छापून आलेली बातमी पाहून धक्काच बसला. नामसाधर्म्यामुळे झालेली चूक त्याच्या लक्षात आली. पण त्यातून सावरून आपल्या बद्दल काय लिहिलंय, हे ते वाचू लागला. विध्वंसक स्फोटकाचा जनक,'इमारती,पुल,रस्ते उद्धवस्त करणाऱ्या डायनामाईट स्फोटचा निर्माता जगातील अशांततेचा फायदा उठवीत विध्वंसक स्फोटकांचा उत्पादनातून अफाट संपत्ती कमावलेला, हि स्वतः बद्दलची अशी वर्णनं वाचून तो नखशिखांत हादरला. आपल्या मृत्यूनंतर आपली ही 'अशी' ओळख मागे राहणार ? या विचाराने तो अंतर्बाह्य बदलला. आपलं चांगलं नाव माघे राहण्यासाठी, तो शांततेसाठी काम करू लागला. पुढचं आयुष्य त्याने जागतिक शांतता या ध्येयसाठीच खर्च केलं. तो ऑल्फ्रेड नोबेल ! नोबेल पारितोषिकांचा जनक ! मग तुमची ध्येय कशी आहे ? तुमची कशी ओळख मागे राहावी असे तुम्हाला वाटतं ...?
प्रा.नितीन बानुगडे पाटील
(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)
All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
Tags:
यशाचा पासवर्ड