यशाचा पासवर्ड - कर्तव्य
" कर्तव्याला विसरणारी माणसं कर्तबगार होऊच शकत नाही.. !"
अलीकडचीच गोष्ट. एका वृद्धाश्रमात गेलो होतो. वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांच्या चेहऱ्यावर कमालीची अस्वस्थता दिसली. त्यांना विचारलं काय झालं ? तेव्हा त्यांनी सांगीतले कि, ताजी घटना आहे. इथे एक वृद्ध गृहस्थ होते. त्यांना एकुलता एक मुलगा. ते शेतकरी असल्याने त्यांनी मुलाला लाडाकोडात वाढवला. मुलानं खूप शिकावं; नाव कमवावं हि आई-वडिलांची इच्छा ! वडील मुलाला सांगत, 'तु खूप मोठा हो. खूप शिक. माझी फिकीर करू नकोस. माझ्या कष्टांची फिकीर करू नकोस.' वडिलांच्या कष्टांवर पोरगा शिकत राहिला. मोठा मोठा होत गेला. जिल्हाधिकारी झाला. बघता बघता वडिलांच्या कष्टांचं चीज झालं; त्यासरशी मुलानं वडिलांच्या कष्टाचं चीज झालं. जिल्हाधिकारी झाल्यावर वडिलांची रवानगी सरळ इथे वृद्धाश्रमात केली. वडील एक एक दिवस ढकलू लागले. एक दिवस उजाडला त्यादिवशी वृद्ध वडिलांना कळून चुकलं कि, आपण आता फार काळ जगत नाही. त्यांनी त्यादृष्टीने वृद्धाश्रमातल्या अधिकाऱ्यांना जवळ बोलावलं आणि त्यांना सांगितलं,' आता मी फार काळ जगेन असे वाटत नाही. पण शेवटचं एकदा मुलाला बघायचंय !'
दुसरा दिवस उजाडला. आजोबा वाट बघत बसले. येणार, येणार माझा मुलगा येणार ! डोळे दरवाजाकडे होते. तेव्हढ्यात दरवाजात पावलं वाजली. आजोबा आतुरले. डोळ्यांच्या ज्योती प्रज्वलित झाल्या. आला, आला, माझा मुलगा आला. तो दारात उभा राहिला. वृद्धानं बघितलं मात्र, आणि जीवघेणी कळ उठली. त्यांनी मान तिरकी केली. खेळ संपला तिथेच दारात उभा होता, त्या जिल्हाधिकारी नावाच्या मुलाचा ड्रायव्हर ! मुलगा आलाच नव्हता. त्याच्याकडे काय मागितलं होतं वडिलांनी..? पैसा...? आधार...? नाही ! वडिलांनी मागितलं होतं फक्त, मला तुझा चेहरा एकदा नजरेत साठवू दे. पण तेही त्यांच्या वाट्याला नाही आलं. त्या जिल्हाधिकाऱ्याने पाठवलेल्या ड्रायव्हरच्या हातात एक पाकीट होतं. वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्यानं ते पाकीट घेतलं त्यात एक चिट्ठी होती, ती काढली. वाचली. त्यात लिहीलं होतं, ' एका महत्वाच्या मीटिंगमध्ये अडकल्यामुळे मी येऊ शकलो नाही. पण माझे वडील जर गेले असतील, तर त्यांचा अंत्यविधी आता तुम्हीच करा. अंत्यविधीच्या खर्चाचे अकराशे रुपये मी सोबत पाठवून देत आहे. हा निरोप कळण्यापूर्वीच वृद्धाने मुलाऐवजी अपुले मरण सताड डोळे उघडे ठेवून पाहिलं होतं. काय म्हणायचं ह्या अनुभवाला ? वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाने प्रश्न केला. आता मीही अस्वस्थ झालो.
Very great full speech
उत्तर द्याहटवा