Nitin Banugade Patil | स्व:ओळख | Yashacha Password

यशाचा पासवर्ड : स्व:ओळख 

जी माणसं स्वतःला यश त्यानांच ओळख देते..!

              यशस्वी माणसांचं सार्यांना अप्रूप वाटतं, मात्र यशाचं मोजमाप करताना, त्यांच्या अंगी ते जन्मत:च होतं. वगैरे वगैरे बाता मारत, ते त्याला शक्य झालं ते आपल्याला का शक्य झालं नाही. याचं स्पष्टीकरण देतात. वास्तविक, लंगड्या सबबी सांगताना, आपल्यातही ते गुण होते,आहेत. आपणच त्याचा विकास केला नाही, हे ते सोयीस्कररीत्या ते विसरतात. मानवी व्यक्तिमत्वाचं संशोधक,'तुम्ही आम्हाला नवजात शिशु द्या,आम्ही तुम्हाला हवे ते घडवून दाखवतो...' असं ठामपणे सांगतात सांगतात, ते यामुळेच ! जन्मतः कुणीच कमजोर वा ताकदवान नसतो. तुमची आजूबाजूची परिस्थिती,सभोवतालचं वातावरण,येणारे अनुभव, होणारे संस्कार आणि महत्वाचे स्वतः तुम्हीच तुम्हाला घडवत असतात. 

                                  
सिंह Story


                एकदा एक सिंहाचं बछडं चुकून जंगलात चुकलं. चुकून ते बकऱ्यांच्या कळपात मिसळलं. ते बकऱ्यांच्या सोबतच राहायला लागलं. त्यांच्यासारखाच जगायला-वागायलाच लागलं. ते बकरीसारखंच बे-बे ओरडू लागलं त्यांच्यासारखं गवत खाऊ लागलं. ते विसरलेच कि, आपण सिंह आहोत... ते पुरतं बकराळलं !

                एके दिवशी त्यांच बकऱ्यांच्या कळपावर सिंहाचा छापा पडला. बकऱ्या गेल्या पळून !  पण ते बछडं मात्र सिंहाच्या तावडीत सापडलं तसं सिंहाने त्याला आश्चयर्याने विचारले, 'तू इकडं कसा ?' तसं बछडं म्हणाले, 'मी.. मी पहिल्यापासूनच इकडेच आहे.' तसा सिंहाला राग आला. 'सिंह असून बकऱ्यासारखं जगतोस ?' त्याने फाडदिशी बछड्याला वाजविली. तसं बछडं बे बे करत ओरडू लागलं, तसा सिंह आणखीनच संतापला. त्यांना रागापोटी अस्मानभेदी डरकाळी फोडली. तशी भीतीपोटी त्या बछड्याची डरकाळी फुटली. तसा सिंह म्हणाला, 'कळलं का... कोण आहेस तु ? 

               मग सिंहाने त्याला एका विहिरीपाशी नेलं, सांगितलं, खाली बघ. पाण्यात बघ ! बछड्याने पाण्यात बघितलं. पाण्यात दोघांची प्रतिबिंब ! तसा सिंह म्हणाला, माझ्यासारखाच दिसतोच ना ? बछडयाने मान डोलावली. 

               'अरे, मग इकडे काय तुझं ? चल, सिंह आहेस. सिंहासारखा जग..!! '

   असा प्रत्येकात सिंह असतोच. फक्त जाणीव व्हावी लागते !

        या जाणिवेसाठीच शिक्षण महत्वाचं ठरतं. तुम्ही कोण आहेत ? तुमच्यात काय आहे ? तुम्ही काय करू शकता ? हे जे सांगतं, ते शिक्षण ! मुळात एज्युकेशन हा शब्द तीन ल्याटिन शब्दांनी मिळून बनलाय आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटम म्हणजे मुलांमधले सुप्त गुण शोधणं. त्या गुणांचं संवर्धन करणं आणि त्याला योग्य स्थान मिळवून देणं,म्हणजे शिक्षण !

                                   
Shala Colledge


           मात्र अजूनही आपल्या इथलं शिक्षण उत्तरपत्रिकेतल्या गुणांतच अडकलं आहे. त्यातून सुप्त अंगभूत गुणांचा शोधच घेतला जात नाही. घेतला गेला, तर त्याचं संवर्धन होत नाही आणि झालं, तर त्याला योग्य स्थान मिळत नाही. नोकरी आणि भाकरीच्या शोधात आवडीच्या क्षेत्रात जाणं घडत नाही. जिथं जाणं घडतं, ते आवडीचं क्षेत्र असत नाही. मग उत्तम- सर्वोत्तम घडणार कसं ??

              ज्याच्यात विलक्षण क्रिडापैलुत्व त्याला गणिताची प्रमेय सोडवण्यात अडकावं ? ज्याला गणिताची आवड त्याला 'डान्स' च्या रियॅलिटी शो मध्ये धाडण्यासाठी झटावं ? व्यक्तित्वात असलेल्या नैसर्गिक गुणवत्तेची हि हेळसांडच !

           कदाचित शंभर कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाला ऑलिम्पिक मध्ये एखाद-दुसरं सुवर्णपदक मिळतं आणि चीन सुवर्णपदकांची शंभरी गाठतो. याचं हेच कारण असावं का ? आपल्यातील जे सर्वोत्तम आहे, त्या गुणांचा वापर करीत, त्याला अपार कष्टाने धारदार बनवत, त्या क्षेत्रात पराकोटीच्या समर्पण वृत्तीने स्वतः ला झोकून दिले, तर वैभवी यशोशिखर तुम्हाला गाठतंच !

                         
sachin tendulkar Marathi


              क्रिकेटच्या 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर बारावीला इंग्रजीत नापास झाला. पण आज बारावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिनवर 'धडा' आहे...!

यशाचा 'धडा' गिरवण्यास एवढा 'धडा' पुरेसा आहे... 

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

 

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : Nitinbanugadepatil.com

All this Content Copyrights Reserved | Nitinbanugadepatil.com

 

0 Comments

Newest