अंत:प्रज्ञा म्हणजे काय ? | Nitin Banugade Patil quotes | Blog about Soul and Energy

यशाचा पासवर्ड - अंतःप्रेरणा (Intuition)

दुसरे कुणीही तुम्हाला घडवू शकत नाही, तुमची अंत:प्रेरणाच तुम्हाला घडविते...

Cover Topics :

1) अंत:प्रज्ञा म्हणजे काय ?

2) सात पिढ्या पुरतील एवढं येणं शिल्लक होत. पण त्या वह्या तुकोबांनी (Sant Tukaram)                      यांनी  सरळ इंद्रायणीत का बुडविल्या ?

3) सुखाच्या ऐश्वर्यसंपन्न छत्राखाली आनंदाच्या रंगात रंगलेल्या गौतम चे गौतम बुद्ध कसे झाले ?

4) शिवरायांचे (Shivaji Maharaj) ऊर्जास्रोत राजमाता जिजाऊ यांचे देशासाठी योगदान !

1) अंत:प्रज्ञा म्हणजे काय ?

बुद्धी आणि इंद्रीयं याच्यापलीकडे एक शक्ती असते, ती अंत:प्रज्ञा ! तीच अंत:प्रेरणा जागवत राहते.हि शक्ती प्रत्येकातच असते. गरज या प्रज्ञेचा वापर करण्याची ! मात्र आपल्यात असलेल्या या प्रज्ञेचा - शक्तीचा शोधच अनेकांना नसतो. त्यामुळेच ते आहे तिथेच; आहे त्या परिस्थितीच अडकून राहतात; तर काही या प्रज्ञेचा वापर करून आपल्या अवतीभोवतीचा , आपल्या जगण्याचा , परिस्थितीचा , समाजाचा , राष्ट्राचा , उद्भवणाऱ्या समस्या प्रश्नाचा वेध घेत, स्वतः च्या जाणीवा प्रघल्भ करत काही शोधण्याची- मिळवण्याची प्रक्रिया चिंतनातून - विचारातून गतिमान करतात. एखादं कोड सोडवण्यासाठी झपाटल्यासारखं धडपडत राहावं आणि एखाद्या अवचित क्षणी सुटून जावं. तसंच सातत्याने एखादया गोष्टीवर विचार अचानक आत काही तरी स्फुरतं. उसळी मारून ते मन: पलटवार येतं. मनातला काळोख हटवून सारं स्वच्छ दिसू लागतं. आपल्या अंत: प्रेरणेने दिलेलं ते उत्तर असतं. मनात रात्रंदिन चाललेल्या युद्धाच्या प्रसंगातून साकारलेलं ते माणूस बदलतो. त्याला लागलेल्या जीवनशोधामुळे योग्य दिशेने वाटचाल करू लागतो. जग बदलण्याचा विलक्षण ओढीने कमला लागतो. हा बदल अनेकांना आश्चर्यचकीत करतो. पुढे तो असामान्य वाढू लागतो. 

                                                           
Marathi Motivation

2) सात पिढ्या पुरतील एवढं येणं शिल्लक होत. पण त्या वह्या तुकोबांनी (Sant Tukaram) यांनी  सरळ इंद्रायणीत का बुडविल्या ?

दुष्काळाने आई-वडील-बायको-पोरं ओढून नेली काळाच्या घाला पडला आणि तुकोबाराय व्यथित झाले. जिवनार्थाच्या शोधासाठी भंडाराच्या डोंगरावर विचार साधना करू लागले. उत्तर मिळालं. प्रेरणा झाली. तुकोबाराय माघारी आले. इंद्रायणीकाठी कान्होबाला महाजनकीच्या वह्या घेऊन बोलावलं. सात पिढ्या पुरतील एवढं येणं शिल्लक होत. पण त्या वह्या तुकोबांनी सरळ इंद्रायणीत बुडविल्या आणि उद्गारले, मला कोणाचं येणं नाही, मला कोणाचं देणं नाही...!

तुकोबांना उमजलं होतं, काय कमवायचं ते ? आणि तुकोबाराय बुडती हे जन न देखवे डोळा.... म्हणोनि कळवळा येतसे ।। म्हणत खोट्या रूढी, अंधश्रद्धा, वर्ण्य- जातीमध्ये पसरल्या लोकांना उध्दरण्यासाठी, त्यांना योग्य दिशेला नेण्यासाठी कार्यरत झाले. भक्तिमार्गाचा जागर मांडीत त्यांनी शक्तीजागर केला. तुकोबांच्या ठायी निर्माण झालेल्या अंत:प्रेरणेने हे घडविलं. 


3) सुखाच्या ऐश्वर्यसंपन्न छत्राखाली आनंदाच्या रंगात रंगलेल्या गौतम चे गौतम बुद्ध कसे झाले ?

महालाच्या श्रीमंत भिंतीआड आणि सुखाच्या ऐश्वर्यसंपन्न छत्राखाली आनंदाच्या रंगात रंगलेल्या गौतमाला बंधिस्त कोंदनातून मोकळ्या आकाशाच्या अंगणात आल्यावर जी विकल आणि व्याकुळ करणारी विराट दुःख दिसली, त्यातून गौतम अंतबार्ह्य थरारला. हि दुःखच त्याचा जगण्याला कलाटणी देणारी विलक्षण प्रेरणा बनली आणि त्यातूनच बुद्ध आकारास आला...!

                                                        
गौतम बुद्ध Marathi Buddha


4) शिवरायांचे (Shivaji Maharaj) ऊर्जास्रोत राजमाता जिजाऊ यांचे देशासाठी योगदान !

आजूबाजूचा अन्याय-अत्याचार पाहवेना, लेकी बाळीची आब्रू सुरक्षित राहीना, रयतेचे हाल सोसवेनात. ज्यांनी हे रोखायचं, ते आपल्या तलवारीचा पराक्रम अन्याय करणार्याचीच तख्त मजबूत करण्यासाठी कारणी लावताआहे, हे पाहून एक (Rajmata Jijau) सौदामिनी लखलखली... रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र उभं राहिलं पाहिजे, या प्रेरणेने तेजाळली अन आपल्या पुत्राला त्या साठी विलक्षण तेजाने घडवू लागली. त्याच्या उरात मातीचीच जगणं आणि अन्यायाविरुद्धच धग्धगणे रुजवू लागली. हि आई जिजाऊच शिवरायांची जिवंत प्रेरणा झाली. या प्रेरणेतूनच महाराष्ट्र घडला....

                                                        
Rajmata Jijau Marathi

काही घडविण्यासाठी वा घडण्यासाठी हि प्रेरणाच महत्वाची ठरते. ती अंत:प्रेरणा ! ती मिळणं , समजणे गरजेचं ! ती विचारातून मिळतं... ती अंत:प्रेरणा चिंतातुन लाभते. ती महापुरुषांच्या चरित्रातून घेता येते. इतर कुणी येऊन बदल घडवावेत, यापेक्षा आपण तो घडवू शकतो, या विश्वासातून ती प्रेरणा प्राप्त होते. स्वतः बरोबर जग घडवायलाही सिद्ध, सज्ज करते. 

सारीच माणसं जन्मतः सामान्यच असतात. अश्या प्रेरणेने जागृत होऊन घडवल्या कर्तृत्वाने ती असामान्य होतात. आपणही असामान्य होऊ शकतो....!!

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

nitin bangude patil

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : Nitinbanugadepatil.com

All this Content Copyrights Reserved | Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

2 टिप्पण्या

  1. अप्रतिम विचार मांडले सर तुम्ही
    माणसाच्या आयुष्यात फार संकट येतात. पण ती संकट माणसाला आतून बळकट बनवतात.
    कुंभाराला मडके तया र करण्यासाठी आधी माती व्यवस्थित मळवून घ्यावी लागते. तेव्हा कुठे त्या ओल्या मातीच्या गोळ्या ला योग्य तो आकार प्राप्त होतो. धन्यवाद सर

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने