Nitin Bangude Patil | जगजेत्ता नेपोलियन च्या यशाचा पासवर्ड खास तुमच्यासाठी...! | Yashacha Password

यशाचा पासवर्ड - निश्चय 

एक तरुण गुराखी रिकामपणाचा उद्योग म्हणून झाडाची फांदी तोडत होता. पण ज्या फांदीवर तो बसला होता तीच फांदी तोडण्याचा अजब उद्योग त्या राज्याचा प्रधानाने बघितला. दिसायला देखणा असलेला पण बुद्धी अन ज्ञानाचा लवलेश नसलेला हा गुराखी पाहून त्याच्या मनात एक कल्पनाआली. त्या राज्याच्या राज्यकन्येने त्याचा अपमान केला होता. राजकन्या मोठी विद्वान आणि प्रकांड पंडित होती. प्रधानाने ह्या गुराख्याचं तिच्याशी लग्न लावून देऊन आपल्या अपमानाचा बदला घेण्याचे ठरविले. मोठ्या हुशारीने त्याने गुराख्याला विद्वान पंडितांचे रूप दिलं. साऱ्याना चतुराईने तयार करून त्याचं राज्यकन्येशी लग्न लावलं व आपलं इप्सित साध्य केलं. 
                                               
महाकवी कालिदास


मात्र या साऱ्याबद्दल अनभिज्ञ असणाऱ्या राज्यकन्येने लग्न झाल्यावर एकांतात आपल्या या विद्वान पतीला प्रश्न विचारला. अस्ति कश्चित वाग्विशेष: ? म्हणजे वाड:मयाबद्दल काही विशेष ज्ञान आहे का..? अजिबातच न शिकलेला आणि कमी बुद्धी असलेल्या या गुराखी पतीला काहीच कळत नव्हतं. परिणामी, त्यांचं बिंग फुटलं. त्याच्या या अडाणीपणाद्दल त्याची पत्नी झालेली राजकन्या त्याला प्रचंड टाकून बोलू लागली, चेष्टा करू लागली... आपल्या पत्नीने केलेला हा अपमान त्याला सहन झाला नाही. त्याने तिथेच विद्वान नि प्रकांड पंडित व्हायचा निश्चय केला. आणि सरळ जंगलाची वाट धरली. काली मातेच्या मंदिरात तो ज्ञानसाधना करू लागला. त्याने प्रयत्नपूर्वक आपला निश्चय तडीस नेला. अत्यंत विद्यासंपन्न होऊन तो परतला.. आपला प्रतिभा गुणांवर तो संस्कृत भाषेतील कवीकुलभूषण ठरला. कालीमातेच्या समोर ज्ञान संपादन केलं म्हणून कालिदास झालेला हा सर्वसामान्य गुराखी आपल्या निश्चयाच्या जोरावर ' महाकवी कालिदास ' म्हणून विश्वप्रसिद्ध झाला. 
                                              
महाकवी कालिदास


तुम्ही कोण आहात त्याने काहीच फरक पडत नाही.तुमचा निश्चयच तुम्ही कोण होणार, हे ठरवत असतो. तुमच्यातील उणिवा तुमच्या अडचणी ठरतात. पण त्याच अडचणीचं पंखात रूपांतर करून यशाच्या आभाळात भरारी मारता येते. फक्त झेप घेण्याचा ठाम निश्चय हवा. तुमच्यात गुण असोत वा नसोत तुम्ही सबल असो वा दुर्बल. तुमच्याकडे फक्त दृढ निश्चय हवा. तोच तुम्हाला साऱ्या संकटातून यशाच्या सर्वोच्च स्थानी पोहचवत असतो. न्यूटनला गणित आणि भौतिकशास्त्र प्रचंड अवघड जात होते. चार्ल्स डार्विनच्या उनाडपणामुळे त्याचे वडील वैतागले होते. जेम्स व्याटला त्यांच्या शाळेने मूर्ख ठरविलं होतं. पण निव्वळ निश्चयाच्या बळावर या साऱ्यांनी स्वतः च्या दुर्बलता, अक्षमतांना गाडून त्यांच्या उरावर यशाचा ध्वज फडकावला. ते सांगतात, एकदा तुम्ही निश्चय केला कि त्यांच्या परिपूर्णतेसाठी तुमच्या शारीरिक, मानसिक शक्ती एकवटल्या जातात. त्या तुमच्या निश्चयाभोवती केंद्रीभूत होतात. निश्चयात अद्भुत शक्ती असते. ती पूर्ण दृढतेने आणि झोकून देऊन काम करायला भाग पाडते. तुमचा निश्चयच माघारी जाण्याचे सारे दोर कापून टाकतो. पुढे येणाऱ्या संकटांना उध्वस्त करण्यासाठी सामर्थ्यशील बनवितो. निश्चय मन, मेंदू, मस्तिष्क पूर्ण एकाग्र बनवतो. मनाची द्विधा अवस्था संपवितो. 
                                                
Isaac Newton


 नेपोलियन यशस्वी ठरायचा याचं कारण तो द्विधा अवस्थेत कधी अडकला नाही... तो लक्ष निश्चित करायचा अन सरळ निशाण्यावर वार साधायचा ! परिस्थितीपेक्षा आपण प्रबळ बनणे, हाच परिस्थीवर विजय मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग ! हि प्रबळ बनण्याची शक्ती निश्चय बहाल करतो. जी संकट तुमच्या शक्तीपुढे झुकत नाही, ती तुमच्या दृढनिश्चयापुढेच झुकत असतात. तुमचा निश्चयच तुम्हाला हरू देत नाही. अब्राहम लिंकनने स्वातंत्र्य संघर्षावेळी डायरीत लिहिलं होतं, हे काम मी अवश्य पूर्ण करिन... ! परिस्थिती भयानक होती पण त्याच्या या निश्चयानेच त्यांना बळ दिलं अन देशाचं नेतृत्व त्यांच्याकडे आले. आपले ठरविलेले कार्य त्याने पूर्ण केले. 
                                          
नेपोलियन


एखादी गोष्ट करायचीच हे ठरविलं कि मग तो निश्चय होतो. तो दृढ निश्चय झाला कि मग झपाटले पण येते. मग टिका, निंदा, अपयश काही येवो निश्चयी व्यक्ती ढळत नाही. अढळपद मिळविण्याचा निश्चय करणाऱ्या ध्रुवासारखाच तो अढळ असतो. तोच निश्चय तुम्हाला यशाच्या अढळ उंचीवर नेतो...!

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

 
नितीन बानुगडे पाटील

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : Nitinbanugadepatil.com

All this Content Copyrights Reserved | Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Post a Comment